DASBODH CHINTAN दासबोध चिंतन


                                                    || श्री राम समर्थ || 
                                                          
                                            ग्रंथारंभलक्षण  ( मंगलाचरण )

                      श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिले जी येथ | 
                      श्रवण केलियाने प्राप्त | काय आहे || श्रीराम || 

सर्व साधारणपणे प्रत्येक माणसाच्या मनात एखादी नविन किंवा बंद वस्तु पाहिली मग तो एखादा डबा असो, पेटी असो एखादे पुस्तक असो वा एखादा जाड ग्रंथ असो, हे  कुतूहल असते की आत काय आहे व ते आपल्याला उपयुक्त वा लाभदायक आहे का ? 

समर्थांनी आपल्या बारा वर्षाच्या तप:साधने नंतर प्रभुरामचंद्राच्या आज्ञेनुसार आसेतूहिमाचल जे भारत भ्रमण केले त्यात त्यांना जी असंख्य माणसे भेटली त्यांच्या मनाचा,त्यांच्या विचारधारेचा,त्यांच्या देहबोलीचा अत्यंत सूक्ष्म पणे अभ्यास केला. 

पहावी घरांची घरे या दासबोधातीलच वचनाप्रमाणे समर्थांनी प्रत्येक घर, त्या घरातील माणसे यांच्या अंतर्मनाचा मागोवा घेत समाजाला नेमक काय पाहिजे याचा ठोकताळा स्वतःच्याच मनाशी बांधून दासबोध या ग्रंथाची निर्मिती केली. 

आपल्या  तप:साधनेच्या काळातील निरनिराळ्या ग्रंथांचा केलेला अभ्यास, भ्रमणकाळात केलेले निरीक्षण आणि मुख्य आत्मप्रचिती यांची योग्य सांगड घालून माणसाला उत्तम प्रपंच करताना परमार्थ कसा साधावा हे सांगण्यासाठी लगेचच पुढच्या श्लोकात त्यांनी ... 

                       ग्रंथा नाम दासबोध । गुरु शिष्यांचा संवाद ।।
                       येथे बोलिला विशद । भक्तिमार्ग ।। श्रीराम ।। 

असे उत्तरही दिले . 
एखादा उत्तम शिल्पकार ज्या प्रमाणे अवजारांनी दगडातील मूर्तीला जिवंत करतो त्या प्रमाणे समर्थांनी माणसाच्या अंतर्मनावरील मळभ
दूर करण्यासाठी भक्तिमार्गाचा म्हणजेच भक्ती या सेवारूपी अवजाराचा उत्तम उपयोग केला.

                    भक्तीचेनि योगे देव । निश्चये   पावती मानव ।
                     ऐसा आहे  आभिप्राव । इये ग्रंथी ।। श्रीराम ।।

अशी या दासबोध ग्रंथाची फळश्रुती ग्रंथाच्या सुरवातीलाच सांगून समर्थांनी स्वतःचे वेगळेपण, समाजाविषयीची आस्था,दयाभाव माणसाला दाखवला. 

गुरु शिष्यांच्या या सुखसंवादाच्या माध्यमातून माणसाला देवाची म्हणजेच ऐहिक सुखाबरोबरच पारमार्थिक मोक्षाची वाट कशी सुकर करता येईल हे समर्थांनी दासबोधात वर्णन केले. 

              नवविधा भक्ती आणि ज्ञान । बोलिले वैराग्याचे लक्षण
                  बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिले ।। श्रीराम ।।

प्रापंचिक सुख किंवा दुःख या दोन्ही स्थितीत माणसाने नवविधा भक्ती द्वारे वैराग्यसंपन्न व गुणवान, नीतिवान कसे असावे हे समर्थांनी सांगितले आहे.

विषयसुख उपभोगत असताना मिळणारा आनंद आणि तो भोग संपल्यावर होणारी जीवाची अगतिकता, दुःख हे उपासनेद्वारे कसे संपवावेत व त्या सुख आणि दुःखात  तठस्थपणे राहून कसे वैराग्यसंपन्न व्हावे हे समर्थांनी दासबोधात उलगडवून दाखविले आहे. 

शेवटी भाव तैसा देव या उक्तीप्रमाणे हे दासबोधाचे वाचन,मनन - चिंतन अथवा पारायण करत असताना आपल्या अंतर्मनात शुद्धभाव कसे निर्माण होतील हे समर्थांनी नामसंकीर्तनाद्वारे व त्रयोदशाक्षरी श्रीराम मंत्राद्वारे प्रकटपणे आणि स्पष्टपणे सांगितले आहे . 

तो श्रीराम मंत्र .... 

                                 ।।श्रीराम जयराम जय जय राम।।


                                    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।


श्री. विद्याधरबुवा वैशंपायन(रामदासी),
 सज्जनगड 

















Comments

Popular posts from this blog

समर्थांचा परमेश्वरवेध..